Wednesday, September 1, 2010

कापसाला साडेचार हजार रुपये हमीभाव देण्याची मागणी - विदर्भ जनआंदोलन समितीचा आंदोलनाचा इशारा

कापसाला साडेचार हजार रुपये हमीभाव देण्याची मागणी
विदर्भ जनआंदोलन समितीचा आंदोलनाचा इशारा
नागपूर, १ सप्टेंबर / प्रतिनिधी

अतिवृष्टीमुळे देशभरातील ११० लाख हेक्टरमधील कापसाचे पीक धोक्यात आल्याने शेतकऱ्यांना मोठय़ा प्रमाणात फटका बसणार आहे. त्यासाठी कापसाला साडेचार हजार रुपये प्रती क्विंटल हमीभाव देण्याच्या मागणीसाठी आंदोलनाचा इशारा विदर्भ जनआंदोलन समितीने दिला आहे.
यंदा बीटी बियाण्यांची विक्रमी ११० लाख हेक्टरमध्ये पेरणी करण्यात आल्याचे केंद्र सरकारनेच जाहीर केले आहे. राज्यात कापसाचे क्षेत्र ४२ लाख हेक्टर असून यातील २८ लाख हेक्टर विदर्भातील आहेत. विदर्भ व मराठवाडय़ात अतिवृष्टीमुळे कापसाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. कर्जबाजारी शेतकऱ्यांना या संकटाने चिंतातूर केले आहे. कापसावर प्रती हेक्टरी सुमारे २५ हजार रुपये खर्च आला. त्यामुळे पीक धोक्यात आल्यास शेतकऱ्यांना सुमारे २७ हजार ५०० कोटी रुपयांचा फटका बसणार आहे. पेरणीचा खर्च लक्षात घेतल्यास विदर्भातील शेतकऱ्यांनी सात हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. कापसाच्या लागवडीवर यंदा खर्च दुप्पट गेला आहे. मजुरी व खताच्या मागणीमुळे शेतकरी हतबल झाले आहेत. बँकांनी अर्थपुरवठा न केल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आले. पश्चिम विदर्भातील कृषी संकट आता संपूर्ण विदर्भासह मराठवाडा, खान्देश आणि उत्तर महाराष्ट्रात पसरले आहे. सुमारे ३० लाख शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कापसाचा भाव साडे चार हजार रुपये क्विंटल करणे आवश्यक असल्याचे किशोर तिवारी यांनी म्हटले आहे. तसेच, पेरणीचा एकंदरीत खर्च त्यांनी केंद्र व राज्य सरकारकडे पाठवले आहे.
शेतकऱ्यांना चार हजार रुपये क्विंटल भाव मिळण्याची चर्चा आहे. सध्या बाजारभावच तितका असून शेजारच्या पाकिस्तान आणि चीनमध्ये पाच हजार रुपये प्रती क्विंटल भाव राहण्याची शक्यता आहे. कापसाचे हमी भाव न वाढवल्यास गिरणी मालक व व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची आणखी पिळवणूक होईल. या पाश्र्वभूमीवर कापसाचे भाव न वाढवल्यास २ ऑक्टोबरपासून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा किशोर तिवारी यांच्यासह समितीचे सचिव मोहन जाधव, सुरेश बोलेनवार, मोरेश्वर वातिले, अंकित नैताम, भीमराव नैताम, नितीन कांबळे, नंदू जयस्वाल आणि सज्जू राठोड यांनी दिला आहे.

No comments: