Tuesday, March 4, 2014

विदर्भातील ३ लाख हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त-बँकांची वसुली बंद व्हावी व मदत घोषित करावी या मागणीसाठी ८ मार्च जागतिक महिला दिनी शेकडो शेतकरी विधवा उपोषण सत्याग्रह

विदर्भातील ३ लाख हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची व्यथा ऐकताना किशोर तिवारीॅ स्थानिक प्रतिनिधी/यवतमाळ
विदर्भात अतवृष्टीमुळे खरीपाचे १२ लाख हेक्टरमधील पिकांची नासाडी झाल्यानंतर नव्या उमेदीने आशेचा किरण म्हणून रब्बीचे पीक घेण्यासाठी खाजगी सावकाराच्या दारोदारी फिरुन कर्ज घेऊन प्रतीक्षेत असलेल्या मागील ८ दिवसांच्या गारपिटीने संपूर्ण ३ लाख हेक्टरमधील चना, तूर व गहू सारख्या रब्बी पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी प्रचंड संकटात आले असल्याची माहिती विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी दिली.
याच वेळी बँकांनी सक्तीची वसुली सुरू केल्यामुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्येचे सत्र सुरू झाले असून यवतमाळ जिल्ह्य़ातील आर्णी तालुक्यातील वाई- रुई येथील शेतकरी गजानन जतकर, मारेगाव तालुक्यातील जळका येथील शेतकरी अशोक कोहचाडे तर घाटंजी तालुक्यातील गणेरी येथील शेतकरी नागोराव गेडाम यांच्या आत्महत्यांना आघाडी सरकार जबाबदार असून बँकांची वसुली बंद व्हावी व शेतकर्‍यांना तात्काळ मदत घोषित करावी या मागणीसाठी ८ मार्च जागतिक महिला दिनी शेकडो शेतकरी विधवा उपोषण सत्याग्रह करून लोकप्रतिनिधींची झोप जागविण्यासाठी जागरण यज्ञ करतील अशी माहिती विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी दिली. घाटंजी तालुक्यातील सावरगावचे शेतकरी गणपतराव कन्नलवार यांनी गाडी करून ५ ते ६ शेतकर्‍यांची तूर घाटंजीला विकुन आलेल्या रक्कमेचा धनादेश स्टेट बँक पारवा येथे जमा केल्यावर बँक पारवा येथील व्यवस्थापक पांडे यांनी ही सर्व रक्कम आपण पीक कर्जात जमा केली. अशी माहिती दिल्याने गणपतराव कन्नलवार यांना धक्काच बसला. कन्नलवार यांनी यवतमाळ जिल्हाधिकारी यांनी १५ जानेवारीला यवतमाळ जिल्ह्य़ाची आणेवारी ४६ टक्के घोषित करून दुष्काळ जाहीर केला तर महाराष्ट्राचे पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी बँकांच्या सक्तीच्या वसुलीवर रोक लावली असल्याच्या बातम्या दाखविल्यावर तुम्ही या बातम्या घेऊन जिल्हाधिकारी व मंत्र्यांकडे जा, आम्हाला बँक अधिकार्‍यांची सक्तीच्या वसुलीचे आदेश दिले असून आम्ही ते करणार अशी धमकी देऊन हाकलून दिले.
विदर्भात मंत्री येतात घोषणा करतात व जिल्हाधिकारी आणेवारी काढून घोषणा करतात मात्र बँक वसुलीच्या नोटीसा पाठवून शेतकर्‍यांना आत्महत्येस प्रवृत्त करतात याचे सशक्त उदाहरण जळका येथील शेतकरी अशोक कोहचाडे यांची आत्महत्या असून बँकाच्या वसुल्या व शेतकर्‍यांची उपेक्षा यामुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढणार असून याला आघाडी सरकार पूर्णपणे जबाबदार आहे, असा आरोप किशोर तिवारी यांनी केला. जर ८ मार्च पर्यंत खरीप व रब्बीच्या नुकसानीची रक्कम व बँकांच्या सक्तीच्या वसुलीवर रोक लागली नाही तर शेकडो शेतकरी विधवासह दुष्काळग्रस्त शेतकरी बेमुदत उपोषणाचा मार्ग स्वीकारतील व कोणत्याही आमदार व खासदारांना निवडणुकीच्या प्रचारासाठी सभा किंवा दौरे करू देणार नाही, असा इशारा सुद्धा किशोर तिवारी यांनी दिला आहे.

No comments: