Thursday, March 6, 2014

शेतकरी विधवांचा एल्गार-जागतिक महिला दिनी उपोषण करणार

शेतकरी विधवांचा एल्गार-जागतिक महिला दिनी उपोषण करणार
यवतमाळ : खरीप हंगामानंतर विदर्भातील रबी हंगामसुद्धा निसर्गाच्या अवकृपेमुळे उद्ध्वस्त झाला आहे. बँकांच्या सक्तीच्या वसुलीमुळे दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या आत्महत्या सुरू असून बँकांकडून होणारी कर्ज वसुली त्वरित थांबवावी व शेतकर्‍यांना तत्काळ मदत घोषित व्हावी, या मागणीसाठी जागतिक महिला दिनी शेतकरी विधवा उपोषण करणार असल्याची माहिती विदर्भ जनआंदोलन समितीचे किशोर तिवारी यांनी एका प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.
विदर्भात अतवृष्टीमुळे बारा लाख हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाले. रबी पिकासाठी अनेक शेतकर्‍यांना खासगी सावकाराकडून कर्ज घ्यावे लागले. मागील आठ दिवसात गारपिटीने तूर, गहू, चणा आदी रबी पिके उद्ध्वस्त झाली असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. याच वेळी बँकांनी सक्तीची वसुली सुरू केल्यामुळे शेतकरी हतबल झाला असून आत्महत्यांचे सत्र मात्र कायम आहे. जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील वाई रुई येथील गजानन जतकर, मारेगाव तालुक्यातील जळका येथील अशोक कोहचाडे तर घाटंजी तालुक्यातील गणेरी येथील नागोराव गेडाम या शेतकर्‍यांनी मृत्यूला कवटाळले आहे.एकीकडे जिल्ह्यात दुष्काळ घोषित केला जातो तर दुसरीकडे बँका मात्र शेतकर्‍यांकडून कर्ज वसुली करण्यासाठी नोटीस पाठवून शेतकर्‍यांना आत्महत्येस प्रवृत्त करीत असल्याचा आरोप प्रसिद्धी पत्रकातून करण्यात आला आहे. त्यामुळे खरीप व रबीच्या नुकसानीची रक्कम व बँकांच्या सक्तीच्या वसुलीवर प्रतिबंध घालावा, यासाठी आता शेकडो आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवांनी उपोषणाचे अस्त्र उचलले आहे.

शेतकर्‍यांच्या या आत्महत्यांना सरकार व बँक प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करीत ही वसुली तत्काळ थांबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. घाटंजी तालुक्यातील सावरगाव येथील शेतकरी गणपत कन्नलवार यांनी पाच ते सहा शेतकर्‍यांची तूर घाटंजी येथे विकून आलेला रकमेचा धनादेश स्टेट बँक पारवा येथे जमा केल्यावर व्यवस्थापकांनी ही सर्व रक्कम पीक कर्जात जमा करू, अशी माहिती देवून कन्नलवार यांना जबरदस्त धक्का दिला. यावेळी कन्नलवार यांनी यवतमाळ जिल्हाधिकार्‍यांनी १५ जानेवारीला जिल्ह्याची आणेवारी ४६ टक्के घोषित करून दुष्काळ जाहीर केला आहे तर पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी बँकांच्या सक्तीच्या वसुलीवर रोक लावली असल्याच्या बातम्या दाखविल्यावरही सदर बँक व्यवस्थापकांनी त्यांना धमकावून हाकलून दिले.

No comments: