Tuesday, May 3, 2016

“ सरकार आपल्या दारी ”कार्यक्रमांतर्गत धानोरा (मोगल) व घुईखेड येथे जन सुनावणी -८० टक्के शेतकऱ्यांना ३१ मे पूर्व पीक कर्ज वाटप प्रक्रिया पूर्ण करा -किशोर तिवारी

“ सरकार आपल्या दारी कार्यक्रमांतर्गत  धानोरा (मोगल) व घुईखेड येथे जन सुनावणी -८० टक्के शेतकऱ्यांना ३१ मे पूर्व   पीक कर्ज वाटप प्रक्रिया पूर्ण करा -किशोर तिवारी
                                 
·        “ सरकार आपल्या दारी कार्यक्रमांतर्गत
धानोरा (मोगल) व घुईखेड येथे जन सुनावणी संपन्न

·        बेंबळा प्रकल्पग्रस्तांच्या समस्या तातडीने सोडविणार


अमरावती दि. 02 :- ग्रामीण भागात शेती उत्पन्न कमी झाल्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचणेत सापडलेला आहे. शेतकऱ्यांनी आपला आर्थिक विकास साधण्यासाठी शेतीसोबत पशुपालन व दुग्ध व्यवसाय यासारखे शेतीपुरक जोडधंदे करावेअडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी सर्व बँकांनी 80 टक्के शेतकऱ्यांना 31 मे पूर्वी पीक वाटप करावे, अशा सूचना स्व. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिल्या.    
सरकार आपल्या दारी या कार्यक्रमांतर्गत चांदूर रेल्वे तालुक्यातील धानोरा (मोगल) व बेंबळा प्रकल्पग्रस्त घुईखेड या दोन गावात श्री तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली शेतकऱ्यांच्या विविध समस्यांचे निराकरणासाठी जन सुनावणी तसेच शासकीय अधिकाऱ्यांशी जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते गावकऱ्यांना मार्गदर्शन करतांना बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी किरण गित्ते, चांदुर रेल्वेचे उपविभागीय अधिकारी श्री विधाते, जिल्हा शल्य चिकित्सक श्री राऊत, जिल्हा आरोग्य अधिकारी श्री भालेराव, तहसीलदार श्री बढीये, ज्येष्ठ समाजसेवक नरेंद्र बैस, एनजीओचे कार्यकर्ते श्री राहूल बैस, सरपंच योगीता झाकर्डे आदी उपस्थित होते.
श्री तिवारी म्हणाले की, राज्य शासनाने यावर्षी  शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे पुर्नगठन करण्यासोबतच 80 टक्के शेतकऱ्यांना खरीप पिकासाठी पीक कर्ज उपलब्ध करुन देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यासाठी महसूल प्रशासनाने तहसीलदारांकडून सर्व शेतकऱ्यांच्या गावनिहाय यादया तसेच त्यासोबत सात-बारा व आठ-अ तयार करुन सर्व बँकांना उपलब्ध करुन द्याव्यात. शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा सुलभरीतीने होण्यासाठी तालुकानिहाय कर्ज मेळावा घेण्यात यावे. तहसीलदार, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांन तालुकानिहाय यादी तयार करुन शेतकऱ्यांना आवश्यक असलेले कागदपत्रे तयार करुन बँकांना उपलब्ध करुन द्यावेत. एक लाखाच्यावर पीक कर्ज वितरणासाठी बँकेने तारण गहाण (मॉरगेज) मागू नये. यासाठी महसूल यंत्रणा व बँकेच्या शाख प्रमुखांनी आपापसात समन्वय ठेवावा. कोरडवाहू शेतकरी, अल्पभूधारक, सिलींगमध्ये मिळालेली जमीनधारक तसेच पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात यावे. अशा सूचनाही श्री तिवारी यांनी दिल्या.
शेतकऱ्यांनी आपल्या शेतात भरघोस उत्पन्न घेण्यासाठी पारंपारीक शेतीकडे वळावे. शेतात रासायनिक बी-बियाणे व खतांचा वापर न करता, नैसर्गिक बियांण्याचा, जैविक खतांचा, शेणखत, गांडूळ खतांचा वापर करावा. लागवडीचा खर्च नियंत्रित आणल्यास शेतकऱ्यांच्या पीक उत्पादनात नक्कीच वाढ होईल. नगदी पिकावरील खर्च कमी करुन कडधान्य पीके शेतात घेण्याचे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले. शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविण्यात येणाऱ्या शासनाच्या अन्न सुरक्षा योजना, संजय गांधी निराधार योजना, खरीप पीक कर्ज योजना, मुद्रा बँक योजना, मागेल त्याला शेततळे, जलयुक्त शिवार यासारख्या कल्याणकारी योजनांचा लाभ गावातील प्रत्येक गावकऱ्यांना देण्यात यावा. जमिनीतील 200 सेमी पर्यंतचे पाणी कापूस शेतीसाठी वापरल्या जात असल्यामुळे नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत प्रदुषित झाले आहे. यामुळे ग्रामीण भागात अनेक संसर्गजन्य आजारांची लागण होत आहे. यावर प्रभावी उपाय म्हणून घरात, गावात व शेतात पाण्याचे छोटे-छोटे शोष खड्डे तयार करुन पावसाचे पाणी जास्तीत जास्त जमिनीत मुरवा जेणेकरुन जमीनीचे पुर्नभरण होऊन पाण्याची पातळी वाढेल व पर्यायाने पिण्याच्या पाण्याची सोय होईल.
गावात सध्या काम नसल्यामुळे त्यांना मनरेगा अंतर्गत कामे उपलब्धतेसह सुरळीत मस्टर रोल तयार करुन योग्य मोबदला मिळवून दया. धडक सिंचन विहीरीची कामे प्राधान्याने पूर्ण करा. आज आयोजीत जनसुनावणीमध्ये  कुळ वहीवाटीवर ताब्यात असलेल्या व पेरणी करीत असलेल्या जमीनीसंबंधी शासनाला धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी पाठपूरावा करण्यात येणार असल्याचे श्री तिवारी यांनी सांगितले. दारिद्रय रेषेखालील असलेल्या नागरिकांच्या यादया पुन्हा सर्वेक्षण व तपासणी करुन दुरुस्त कराव्यात.  राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत सर्वांना घरे, गॅस कनेक्शन व  पशु पालनासाठी जनावरे उपलब्ध करुन देण्याचे आवाहनही त्यांनी शासकीय यंत्रणांना केले. कार्यक्रमाला धानोरा(मोगल) गावातील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
----------------------------
सरकार आपल्या दारी कार्यक्रमांतर्गत घुईखेड येथे जनसुनावणी
                       चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड गावात आज स्व. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली शेतकऱ्यांचे व बेंबळा प्रकल्पग्रस्तांचे शासकीय यंत्रणेकडे प्रलंबित असलेल्या विविध समस्याचे निराकरण करण्यासाठी जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले होते. अमरावती जिल्हयातील बेंबळा प्रकल्पग्रस्त आठ गावांचे पुर्नवसन सन 2006-2007 मध्ये झाले असले तरी मुलभूत सोयी सुवीधांचा अभाव असल्याचा ग्रामस्थांनी श्री तिवारी यांना सांगितले.
                   भूमी अधिग्रहन अधिनियम 2013 नुसार 25 नागरी सुविधांचा लाभ सर्व गावकऱ्यांना तातडीने देण्यात यावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली. पुर्नवसन व घरबांधणी अनुदान म्हणून रुपये 50 हजार देण्यात यावे. शेतकऱ्यांच्या शेतातील माल चोरीला किंवा वन्यप्राण्यांकडून नुकसान होऊ नये तारेचे कुंपन शासनाकडून पुरविण्यात यावे. आठ प्रकल्पग्रस्त गावांमध्ये हँडपंप सुविधा व पिण्याचे पाण्याची टँकर सुविधा सुरळीत करण्यात यावी. घरकुल योजना व मनरेगा अंतर्गत येणारी कामे सर्व गावांत चांगल्या दर्जाची करण्यात यावी. तसेच गावांतील सर्व विज जोडण्या नवीन करण्यात याव्यात. अशा विविध मागण्या गावकऱ्यांनी श्री तिवारीसमोर मांडल्या. यावर श्री तिवारी व जिल्हाधिकारी गित्ते यांनी सर्व गावकऱ्यांना योग्य मार्गदर्शन केले. पुर्नवसनच्या प्रश्नासोबत इतर सर्व समस्यांचे निराकरण शासकीय यंत्रणेव्दारे तातडीने व सुयोग्य स्वरुपात करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले.
                  घुईखेड येथील जनसुनावणीला ज्येष्ठ समाजिक कार्यकर्ते कृष्णकुमार टावरी, जि.प. सदस्य प्रवीण घुईखेडकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते, जिल्हा कृषी अधिक्षक दत्तात्रय मुळे, जिल्हा पुरवठा अधिकारी श्री वानखडे, जिल्हा शल्य चिकित्यक श्री राऊत, जिल्हा आरोग्य अधिकारी श्री भालेराव, उपविभागीय अधिकारी श्री विधाते, तहसीलदार श्री बढीये, बेंबळा प्रकल्पाचे अभियंता श्री महल्ले तसेच घुईखेडचे ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
 *************

No comments: