Friday, December 15, 2017

बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांचे संकट गंभीर :प्रशासन सरकारची दिशाभुल आहे -किशोर तिवारी


बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांचे संकट गंभीर :प्रशासन सरकारची दिशाभुल आहे -किशोर तिवारी 
दिनांक -१६ डिसेंबर २०१७
राज्यात विदर्भ मराठवाड्यातील कापूस पिकाखाली ४४ लाख हेक्टरचे क्षेत्र असून ऑक्टोबर नंतर सर्वच  ठिकाणी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आहे हे सत्य आहे त्यामुळे आता डिसेंबरनंतर कापसाची आवक प्रचंड प्रमाणात घटली असुन ज्या ज्या शेतकऱ्यांनी सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात रासायनिक खताचा वापर करीत कापसाला पाणी दिले त्यासर्वच शेतकऱ्यांना बोंडअळीचा फटका बसला असुन जुलै ऑगस्ट मध्ये आलेली बोंड तेही बहुतेक कोरडवाहू क्षेत्रात ऑक्टोबर नोव्हेंबर फुटली व सर्वच शेतकऱ्यांचे पहिला व दुसरा वेचा चांगला आला ,त्या कापसाची आवक पाहुन बोंडअळीचे संकट कृषिविभाग कमी आखत असुन सरकारची दिशाभुल करीत असल्याचा गंभीर आरोप कै वसंतराव नाईक शेतकरी स्वा. मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केला आहे . 
यावर्षी महाराष्टात व लगतच्या तेलंगणामध्ये सप्टेंबर -ऑक्टोबर  महिन्यात बोंडअळी संकट आले व आज राज्यात जेमतेम ९८ लाख क्विंटल कापसाची आवक झाली आहे मात्र आपण संपुर्ण विदर्भ मराठवाड्याचा दौरा केल्यांनतर शेतकऱ्यांचे यंदा यामुळे ५० टक्क्यांहून अधिक नुकसान होणार असा प्राथमिक अंदाज दिला होता त्यानुसार सर्वच भागांतून कापसाची आवक डिसेंबरमध्ये घटली असुन बहुतेक शेतकऱ्यांनी कापसाचे पीक नष्ट करून गहु हरभऱ्याची पेरणी केली आहे मात्र कृषी विभागाचे अधिकारी फक्त कार्यालयात बसल्याबसल्या पिकांचे पंचनामे करीत असल्याच्या प्रचंड तक्रारी आपणास मिळाल्या असल्याची माहीती किशोर तिवारी यांनी दिली . 
या खरीप हंगामात  सुरवातीला ३५० ते ४०० लाख क्विंटल कापसाची विक्रमी उत्पादन राज्यात होणार असा विश्वास होता मात्र गुलाबी बोंडअळीने हे कापसाचे उत्पादन १८० ते २२० लाख क्विंटलच्या घरात आणले आहे यामुळे शेतकऱ्यांचे कमीतकमी रु दहा हजार कोटीचे नुकसान झाले आहे मात्र कृषी विभाग बियाणे कंपन्यांवर  कोर्ट केसेस दाखल करून वसुल करून देणार असा पोकळ दावा करीत आहे राष्ट्रीय व राज्य विपदा निधींमधून देण्यात येणारी मदत सुद्धा कृषी विभागाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे तोटकी मिळणार अशी भीती निर्माण झाली कारण सध्या ५ लाखावर कापुस उत्पादक शेतकऱ्यांनी अधिकृत तक्रारी दिल्या आहेत तर सुमारे ५ लाखावर आदीवासी दलीत मागासवर्गीय भूमिहीन शेतकरी बियाणाची पावती व  बियाण्यांच्या पाकिटावरील ‘रॅपर’देखील सादर करण्याची अट असल्यामुळे तसेच हजारो शेतकऱ्यांनी बोगस तण नाशक निरोधक बी जि ३ कापसाचे बियाणे व राज्यात बंदी घातलेले राशी ६९५ लगतच्या राज्यातुन विकत आणुन पेरल्यामुळे तक्रारी करण्यापासुन वंचित असल्याचे सत्य विदर्भ मराठवाड्यात आपल्याला दौऱ्यात दिसल्याचे किशोर तिवारी यांनी म्हटले आहे .एकीकडे  सरकार  कुठलीही बियाणे कंपनी असो, गुन्हे दाखल होतील असा दावा करीत आहे  दोषयुक्त बियाण्यांना विक्रीअगोदर प्रमाणित करणाऱ्या अधिकारी बियाणे कंपन्यांचे हित जोपासत असल्याचा आरोपही किशोर तिवारी यांनी केला आहे . 
यावर्षी ऑगस्टच्या सुरवातीला गुलाबी बोंडअळीचे लगतच्या तेलंगणा राज्यात आलेले संकट आता   संपुर्ण विदर्भ व  मराठवाड्यात ,मध्यप्रदेश ,गुजरात राज्यात पसरले आहे यात महाराष्ट्राच्या कापुस उत्पादक क्षेत्रात प्रचंड नुकसान झाले असुन मात्र कृषी खाते ,केंद्रीय कापूस शोध संस्था ,भारतीय कृषी संशोधन परिषद ,कृषी विद्यापीठ यांनी ह्या अभुतपुर्व संकटावर पुरेसे लक्ष न दिल्यामुळे  विदर्भ व  मराठवाड्यातील सुमारे ७० लाखावर कापुस उत्पादक शेतकरी  दशकातील सर्वात मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करीत असल्यामुळे

कै वसंतराव नाईक शेतकरी स्वा. मिशनने गुलाबी  बोंडअळीचा विषय केंद्रात व राज्यात लावून धरला असून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई ,गुलाबी  बोंडअळीच्या संकटातुन कायम सुटका यासाठी सर्व स्तरावर पाठपुरावा सुरु केला असुन या बोंडअळीच्या प्रकोप टाळण्यासाठी कालबद्ध पंचसूत्री तोडगा शेतकरी स्वा. मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला आहे . 
आपल्या पंचसूत्री बोंडअळी समस्या निवारण कार्यक्रमात किशोर तिवारी यांनी मुख्यमंत्र्याना सादर केलेल्या अहवालात कापुस उत्पादक शेतकऱ्यांच्या गुलाबी  बोंडअळीच्या संकटाला सुरवातीला सरकारने भारतातील देशी कापसाचे बियाणाच्या जागी  आणलेले अमेरीकेचे  संकरीत कापसाचे बियाणेच मूळ कारण असुन व  आता बी टी कापसाचे "बोन्डअळीरक्षक बोल गार्ड" हे तंत्र अळी मारण्यास  यातील विषाणूवर  निरोधकता आल्यामुळें पुर्णपणे अयशस्वी होत असल्यामुळे संपुर्ण विदर्भ मराठवाड्यातील ४० लाख हेक्टरमधील उभे कापसाचे अभूतपूर्व गुलाबी अळीच्या हल्ल्याने पूर्णपणे खल्लास झाले आहे . 
आपल्या पंचसुत्रीमध्ये सादर   केलेल्या प्रस्तावात किशोर तिवारी यांनी सरकारला शेतकऱ्यांचे गुलाबी  अळी यांचा संकटाचा सामना करण्याकरितां प्रबोधनाची मोहीम सुरु करण्याचा व या संकटाचे मूळ कारण आता निवारण करण्याकरीता उपाययोजना ,नुकसान भरपाईसाठी कारवाईची संपुर्ण माहीती त्यासाठी कृषी ,ग्रामविकास व महसुल विभागाचा सहभाग ,कापसाचे गुलाबी अळीग्रस्त पीकामध्ये उभे पीक  गाई म्हशी बैलांना वा बकऱ्याना चारणे त्यामुळे अळीचा सरसकट नाश  होईल ,उरलेले कापसाचे पीक नष्ट करणे ,जमिनीमधील गुलाबी अळीच्या अंडी नष्ट करणे ,कापसाचे पीक डिसेंबर नंतर फरतड न घेता काढून फेकणे ,मॉन्सूनपूर्व कापसाची पेरणी टाळणे ,कापसाचे पीक यावर्षी  गुलाबी अळीग्रस्त झाले असल्यास पुढच्या वर्षी  डाळीचे वा तेलबियांचे पीक घेणे,बियाणे कंपन्या विरुद्धचा सामुहिक नुकसान भरपाईचा दावा सादर करावयाचा असल्यामुळे तक्रारी  दाखल करणे गरजेचे असुन त्यासाठी शेतकऱ्यांना संपुर्ण माहिती देणे ,अमेरीकेचे कापसाचे बियाणे गुलाबी अळीचे निमंत्रक असल्यामुळे या कापसाच्या बियाणांच्या जागी भारतीय सरळ वाणाच्या कापसाचा पेरा करणे एकमेव उपाय कापुस उत्पादक शेतकऱ्यांसमोर असल्यामुळे सरकारने कृषी खाते ,केंद्रीय कापूस शोध संस्था ,भारतीय कृषी संशोधन परिषद ,कृषी विद्यापीठ यांना कामावर लावणे गरजेचे असुन विदेशी बियाणे कीटकनाशक कंपन्याचे कृषि क्षेत्रातील साम्राज्य संपण्याचा निर्वाणीचा सल्ला  किशोर तिवारी यांनी दिला आहे .
= ======================================

No comments: